उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांना 'आंतरिक सुरक्षा सेवा' पदक जाहीर
उदगीर : उदगीर शहर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक गजानन अशोकराव पाटील रातोळीकर यांनी गडचिरोली जिल्ह्यात साडेतीन वर्ष केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झालेले आहे. पोलीस उपनिरीक्षक गजानन अशोकराव पाटील यांनी सन २०१४ ते २०१७ या दरम्यान तीन ते साडेतीन वर्ष नक्शलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील जिमलगठा पोलीस मदत केंद्र संवेदनशील असलेल्या तालुक्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तसेच आहेरी-प्राणहिता जि.गडचिरोली येथे बॉम्ब शोधक व नाशक पथक प्रमुख म्हणून काम करताना ११ ठिकाणी जिवंत बॉम्ब शोधून काढुन त्यांनी नष्ट केले. हे विशेष काम व कार्ये त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केले. त्यांनी केलेल्या तेथील कौतुकास्पद कार्याबद्दल केंद्रीय गृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांचेकडून त्यांना 'आंतरिक सुरक्षा सेवा पदक' जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांचे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक, जमादार, ठाणे अमंलदार, हेडकॉन्स्टेबल, पोलीस कर्मचारी, आदींनी अभिनंदन केले आहे.