उदगीर : लातूर जिल्ह्यासह जळकोट तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. तरी जळकोट तालुक्यात कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने योग्य ती दक्षता घेऊन तत्परतेने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश संसदीय कार्य, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
जळकोट तालुका covid-19 चा प्रादुर्भाव बाबत आयोजित आढावा बैठकीत राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी उपस्थित होते.
राज्यमंत्री संजय बनसोडे पुढे म्हणाले की, जळकोट शहर व ग्रामीण भागातही दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी तालुका प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे त्यांनी निर्देशित केले. त्याप्रमाणेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे तपासण्याची संख्या वाढवावी. जळकोट येथील कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयी सुविधा तसेच इतर अनुषंगिक सुविधा योग्य पद्धतीने व वेळेत व दर्जेदार मिळाव्यात यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोविड केअर सेंटरला दररोज नियमितपणे भेट देऊन तेथील पिण्याच्या पाण्याची सुविधा, बाथरूमची व टॉयलेटची स्वच्छता व आरोग्य सुविधांची पाहणी करणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सूचित केले. उपचार घेत असलेल्या कोणत्याही रुग्णांची तक्रार येऊ देऊ नये त्यांना वेळेत सर्व आरोग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टीने प्रयत्न करावेत असे त्यांनी सूचित केले.
तसेच उपलब्ध असणाऱ्या बेडची संख्या, आरोग्य केंद्रातील रिक्त पदाचा आढावा घेण्यात आला मंजूर रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी अशा सुचना राज्यमंत्री बनसोडे यांनी करून कोरोनाच्या काळात इतर आरोग्यविषयक समस्याकडे ही दुर्लक्ष होऊ नये याकरता योग्य ती खबरदारी घ्यावी. गरोदर महिला आणि मुलांना वेळेवर लसीकरण देण्यात यावे तसेच नवीन कोविड सेंटर च्या प्रस्ताव बाबत त्वरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी तालुक्यातील रस्ते, बांधकाम, कृषी व पाणी पुरवठा विभागातील विविध विकास कामाचा आढावा घेण्यात आला.
उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी जळकोट तालुक्यात प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढगे यांनी आरोग्य विभागाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली.
या आढावा बैठकीस डॉ. सतीश हरिदास, डॉ.शशिकांत डांगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पवार, वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता श्रावण कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांडलीकर, पाणीपुरवठा चे उप अभियंता खोपडे, बाजार समितीचे सभापती मनमत अप्पा किडे, अर्जुन पाटील आगलावे, मारुती पांडे, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.