जिल्हयातील बाजार पेठ, दुकाने, आस्थापना सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत सुरुबराहणार
लातूर : कोरोना विषाणूचा (कोव्हीड-19), प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात शिथीलता देण्यात आलेल्या जिल्हयातील बाजारपेठ, दुकाने,आस्थापना यांना गर्दीचे विभाजन व नियंत्रण होण्याच्या हेतूने सकाळी 9.00 ते 5.00 ऐवजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत (आठवडयातील सातही दिवस) सुरु ठेवण्याची मुभा आज पासून देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता , 1973 चे कलम 144 अन्वये पूढील प्रमाणे आदेश जारी केले आहेत.
लातूर जिल्हयातील सर्व बाजारपेठा, दुकाने, आस्थापनां सकाळी 9.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. परंतु सामाजिक, शारिरीक अंतर राखले जात नसल्याचे निदर्शनास आल्यास बाजारपेठ, दुकाने, आस्थापना तात्काळ बंद करण्यात येतील. तसेच या आदेशात ज्या बाबी नमुद नाहीत परंतु यापूर्वी शासन आदेश व या कार्यालयाचे आदेशान्वये प्रतिबंधीत अथवा शिथील केलेल्या आहेत अशा बाबी त्या बाबीसंदर्भात या पूर्वीच्या लगतच्या आदेशानुसार लागू राहतील.
या आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860 , साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाचे अंमलजबावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी/ कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही, असे ही आदेशात नमुद केले आहे.