उदगीर शहर 19 मेपर्यंत कोरोना मुक्त होणार - राज्यमंत्री संजय बनसोडे


 


उदगीर शहर 19 मेपर्यंत कोरोना मुक्त होणार - राज्यमंत्री संजय बनसोडे


राज्यमंत्री बनसोडे यांच्या उपस्थितीत कोरोना मुक्त झालेल्या 6 रुग्णांना डिस्चार्ज



उदगीर शहरातील 17500 कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली


उदगीर शहरातील प्रत्येक नागरिकाची थर्मल स्कॅनिंग करणार



सामान्य रूग्णालय उदगीर येथून कोरोना मुक्त झालेल्या 6 रुग्णांमध्ये 3 महिला 1 मुलगी व 2 पुरुषांचा समावेश



लातूर : उदगीर शहरात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एका 70 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला व त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर उदगीर शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत जाऊन शहरातील एकूण कोरोना पॉझिटिव रुग्णाची संख्या 29 झाली व त्यामुळे उदगीरची परिस्थिती गंभीर बनेल असे चित्र दिसत असताना शासन-प्रशासन यांनी अत्यंत प्रभावीपणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविल्या. त्यामुळे उदगीर येथील 21 रुग्ण कोरोना मुक्त झालेले आहेत व 19 मे पर्यंत संपूर्ण उदगीर शहर कोरोना मुक्त होईल, असे पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
  आरोग्य विभाग, पोलीस विभाग व महसूल विभागाने परस्परात योग्य समन्वय ठेवून उदगीर शहरात अत्यंत परिणामकारकपणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग शहराच्या इतर भागात झालेला नाही. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील सुमारे साडे सतरा हजार नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात येऊन सुमारे 400 पेक्षा अधिक लोकांचे स्वॅब तपासणी करण्यात आली. त्यामुळे कोरोना संसर्ग झालेले रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांना कोरोना मुक्त करण्यात आरोग्य विभागाने चांगली भूमिका बजावली असे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.
     यापूर्वी 15 रुग्ण कोरोना मुक्त झालेले असून आजचे सहा रुग्ण व उर्वरित सात रुग्णही लवकरच बरे होऊन घरी जातील अशी माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी देऊन यानंतर उदगीर शहरातील प्रत्येक नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून आत्यवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले.
   आज सायंकाळी उदगीर सामान्य रुग्णालयातून कोरोना मुक्त झालेल्या सहा रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णालय प्रशासन, महसूल प्रशासन व पोलीस विभाग तसेच राज्यमंत्री बनसोडे यांनी बरे झालेल्या रुग्णांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
    यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक , अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतिश हरिदास, रुग्णालयाचे नोडल अधिकारी शशिकांत देशपांडे, मुख्याधिकारी भारत राठोड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, पो.नि. महेश शर्मा, यांच्यासह प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते.


जिल्ह्यात पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलीस, आरोग्य व इतर सर्व संबंधित विभाग परस्परात योग्य समन्वय ठेवून काम करत आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना यशस्वीपणे राबवण्यात प्रशासनाला यश येत आहे. तसेच उदगीर शहरासह जिल्ह्यातील नागरिक प्रशासनाला उत्तम प्रकारे सहकार्य करत आहेत.


                                              


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image