'त्या ' सात जणांचे अहवाल निगेटिव्ह उदगीरकरांनी सोडला सुटकेचा निःश्वास
उदगीर : तालुक्यातील कौळखेडच्या 'त्या' सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एल.हरिदास यांनी दिली आहे. गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीत या अहवालाने उदगीरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ही सात जण एकाच कुटुंबातील आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही हे कुटुंब मुंबईहून एका खासगी वाहनाने उदगीर तालुक्यातील कौळखेड येथे आले होते. यातील पाच जणांवर त्यांना स्वतःला व जनतेच्या जीवितास कोरोना विषाणूचा संसर्ग वाढेल अशी धोका निर्माण होईल अशी घातक कृती करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कुटुंबास आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते.
गेल्या दोन दिवसांपासून उदगीर तालुक्यात उलटसुलट अफवा पसरल्या होत्या. मुंबईहून प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने यांच्या अहवालाकडे उदगीर तालुक्याचे लक्ष लागले होते. अखेर गुरुवारी रात्री उशिरा या कुटुंबीयांचे अहवाल प्राप्त झाले असून हे अहवाल निगेटिव्ह आल्याने उदगिरकरानी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य विभाग पोलिस प्रशासनाने महसूल विभाग जर हे नमुने पॉझिटिव्ह आले असते तर त्याची व निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यासाठी पुढाकार घेतला होता. शहरातील खासगी दवाखाने शासकीय वस्तीग्रह निमशासकीय वस्तीगृह काही शाळा महाविद्यालयाची पाहणी करून क्वारंटाईनसाठी यंत्रणा सज्ज ठेवली होती. तालुक्यातील नागरिकांसह प्रशासनानेही या अहवालानंतर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.