लाच घेताना आरोग्य विभागातील दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
लातूर : वैद्यकीय रजेचे व ओव्हर टाईम कामाचे बील ट्रेझरीला सादर करणेसाठी तसेच रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीच्या बीलाचा चेक देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या उदगीर सामान्य रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याची घटना बुधवार, दि. १५ एप्रिल रोजी घडली.
नटवरसिंग वनसिंग तडवी, (वय ३० वर्ष), आणि शिवराज त्र्यंबकराव धानुरे (वय-57 वर्षे) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेल्या आरोपींचे नाव आहे. यामध्ये नटवरसिंग वनसिंग तडवी हे उदगीर सामान्य रुग्णालयात रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी म्हणून तर शिवराज त्र्यंबकराव धानुरे
हे उदगीरच्याच सामान्य रुग्णालायत सहाय्यक अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोन्हीही आरोपींनी तक्रारदारा यांना त्यांच्या
वैद्यकीय रजेचे व ओव्हर टाईम कामाचे बील ट्रेझरीला सादर करणेसाठी तसेच रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीच्या बीलाचा चेक देण्यासाठी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रादारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस उपाधिक्षक माणिक बेद्रे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलिस निरीक्षक
कुमार दराडे यांच्यासह एसीबीच्या टीमने सापळा रचला. दरम्यान आरोपी तडवी व धानुरे हे केलेल्या लाचेची रक्कम तडवी यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.