कोरोना विषाणूच्या अनुषंगाने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात : राज्यमंत्री संजय बनसोडे
लातूर : जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवलेले आहे. या कक्षात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी योजना व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.
आरोग्य संकुलातील सभागृहात कोरोना च्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत राज्यमंत्री बनसोडे बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाठक व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लातूर आरोग्य
प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती तालुकानिहाय घेण्यात आली. तसेच जिल्ह्यात किती लोकांना विलगीकरण व व अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे याविषयी माहिती घेऊन त्यांच्या सर्व लोकांना आरोग्यविषयक व अनुषंगाने इतर सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
विलगीकरण व अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या लोकांचे या काळात समुपदेशन करण्यात यावे तसेच आरोग्य यंत्रणेने स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधी यांना दररोज आपल्या तालुक्यातील स्थिती बाबत अवगत करावे असे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, आशावर्कर्स व इतर कर्मचारी यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला.
यावेळी आरोग्य संचालक डॉ. एकनाथ माले व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली तसेच आरोग्य विभाग कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी सज्ज असल्याचे सांगितले.