कानेगावची शाळा बंद पण शिक्षण सुरूच; व्हाट्सअप ग्रुपवर दिले जातात धडे
कानेगाव-लर्न फ्रॉम होम व वर्क फ्रॉम होम उपक्रमास पालकांचा सकारात्मक प्रतिसाद
उदगीर : सध्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या भीतीने देशात,राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. सर्व शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांसमोर शिकण्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक सुशीलकुमार पांचाळ यांनी कानेगाव शिक्षक-पालक संघ या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून ठेवत आहेत.हा शिक्षक-पालक व्हाट्सअप ग्रुप २०१८ पासून कार्यरत आहे. ग्रुपवर वर्गात,शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम, विद्यार्थ्यांच्या समस्या यावर शैक्षणिक चर्चा नियमितपणे केली जाते.सध्या लॉकडाऊनच्या काळात पालकांना व्हिडीओ कॉल करून शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवत आहेत.इ-कंटेंट,व्हिडीओ,शैक्षणिक युट्युब चॅनल,विविध शैक्षणिक अप्लिकेशन,ऑनलाईन टेस्ट,अभ्यासक्रमावर आधारित पीडीएफ पालकांच्या मोबाईलवर पाठवून अभ्यास करून घेत आहेत.विद्यार्थ्यांनी स्वतः कलाकुसर, हस्तकला यातून गृहउपयोगी वस्तूही बनविल्या आहेत.पांचाळ गुरुजींचा लर्न फ्रॉम होम व वर्क फ्रॉम होम उपक्रमास पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.ज्या पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांना फोन लावून संपर्क साधून अभ्यास दिला जात आहे.यासाठी लातूर जिल्ह्यातील समूहसाधन व गटसाधन केंद्रातील तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक हे झूम मीटिंगमध्ये चर्चा करून 'माझा कोरोना सुट्टीचा उन्हाळी अभ्यास' यावर एक एप्रिलपासून दररोज चर्चा केली जात आहे.यात भाषा,गणित,इंग्रजी, सामान्य ज्ञान,कला यांचे उपक्रम याचेही नियोजन जिल्हास्तरातून केले जात आहे.हे नियोजन करण्यासाठी डायटचे प्राचार्य बी जी चौरे,प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली जामदार ,उपशिक्षणाधिकारी मा.श्री.विशाल दशवंत,गटशिक्षणाधिकारी अनिल पागे,केंद्रप्रमुख शिवाजी एरंडे यांनी प्रत्यक्ष झूम मीटिंगमध्ये सहभाग घेतला,शिक्षकांशी विचारविमर्ष केला.शिकण्याच्या प्रक्रियेपासून विद्यार्थी या महाभयंकर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भापासून दूर ठेवून त्याला अभ्यासात गुंतवून ठेवण्यासाठीचा प्रयत्न शिक्षण विभागकडून केला जात आहे त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांबरोबरच पालकही डिजीटल साक्षर होत आहेत.याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'माझा कोरोना सुट्टीचा उन्हाळी अभ्यास' हा विद्यार्थ्यांना सुट्टीत अभ्यासाची गोडी निर्माण करणारा उपक्रम आहे.विद्यार्थ्यांनी आपापल्या घरातच बसून आपल्या पालकांचा मोबाईल त्यांच्यासमोरच वापरावा.विनाकारण शेजारच्या मित्रालाही सोबत न घेता कुटुंबातील भावंडासोबत ठराविक अंतरावरून अभ्यास करायचा आहे.
सुशीलकुमार पांचाळ