जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन तत्पर : पर्यावरण मंत्री संजय बनसोडे
उदगीर : देशभरात कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असुन यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना करत असुन महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन नेहमीच तत्पर असुन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री संजय बनसोडे यांनी दै.देशोन्नतीशी बोलताना केले आहे.
पुढे बोलताना राज्यमंत्री बनसोडे यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील व शहारील जनता घरीच राहील बाहेर पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी उदगीर प्रशासनाने काय केले याचा आढावा घेवुन, मुंबई, पुणे, शिर्डी या सारख्या ठिकाणाहुण आलेल्या लोकांना ते घराबाहेर पडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.
नगर परिषदेच्या वतीने नागरीकांना जिवनाश्यक वस्तूंचा पुरवठा कशा पद्धतीने होत आहे त्याबद्दल काय खबरदारी घेतली याची माहिती घेवुन सुचना केल्या.
आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यातील संशयित व्यक्तींची संख्या किती आहे, विलगीकरण करण्यासाठी किती बेडची व्यवस्था आहे. गरज पडल्यास तालुक्यातील खाजगी रूग्णालयातील उपलब्ध बेडचा आढावा घेवुन खाजगी व वैद्यकीय सेवा देणाऱ्या डाॅक्टर व इतर कर्मचाऱ्यांची माहिती घेतली.
शासकीय रूग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना पर्सनल किट, सॅनीटायझर, इतर उपयोगी साहित्य यांचा पुरवठा, कर्मचाऱ्यांची संख्या, उपलब्ध औषधाचा साठा, रिक्त जागा, शहरातील खाजगी रूग्णालये बंद राहणार नाहीत याबाबत आढावा घेवुन सुचना दिल्या.
तहसील विभागालाही राज्यमंत्री बनसोडे यांनी बेघर, काम बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबाची राहण्याची व भोजनाची सोय करण्याच्या सूचना देवून स्वस्त धान्य दुकानदाराकडुन धान्याचा पुरवठा होतो की नाही ते तपासावे नागरिकांना कोरोना या रोगाच्या माहितीसाठी कोणकोणत्या उपाय योजना केल्या या संदर्भात सुचना केल्या असल्याचे सांगितले आहे.
१) आवाहन.....
नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेवुन 'घरी रहा, सुरक्षित रहा,' तीन फुटापेक्षा जास्त अंतर राहील याची काळजी घेवुन आपणास कोरडा खोकला, ताप, डोकेदुखी व श्वास घेण्यास त्रास झाल्यास घाबरुण न जाता त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, सॅनीटायझर किंवा साबणाने हात वारंवार धुवावे, खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल किंवा टिशु पेपर धरावा, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जावु नये असे
आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.
२) पाहणी...
तालुक्यातील हेर, देवर्जनसह अनेक ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्यमंत्री बनसोडे यांनी भेट देवून तेथील आरोग्यसंबंधिच्या समस्या समजून घेवुन तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुख- सोई व औषधाच्या तुटवड्याबद्दल विचारणा केली. यावेळी , अप्पर पोलीस अधिक्षक हिमत जाधव, उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, महिला बालकल्याण सभापती ज्योती राठोड, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भारत राठोड, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, पो.नि. महेश शर्मा, सभापती सिद्धेश्वर पाटील, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, शिवाजी मुळे, चंदन पाटील, विजय निटुरे, आदी उपस्थित होते.