सैनिकी विद्यालयात मराठी दिन उत्साहात साजरा
उदगीर : श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून कमांडंट कमांडर बी. के. सिंह, बालाजी मुस्कावाड, अंबिका पारसेवार, बालाजी कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालाजी मुस्कावाड यांनी मराठी दिनाचे महत्त्व विशद करताना, मराठी ही आपली मातृभाषा आहे .तिला आपण आईचा दर्जा दिलेला आहे .आपण महाराष्ट्रात जन्माला आलो त्यामुळे आपली मातृभाषा मराठी आहे .मराठी भाषेचा अभिमान आपणा सर्वांनाच असला पाहिजे .मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे .
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अंबिका पारसेवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या, वि. वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रात मराठी दिन म्हणून साजरा केला जातो .कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यात अनमोल असे लेखन केले आहे त्यामुळे त्यांना मराठी साहित्यातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अमृताहुनी गोड असे म्हटले आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथाचे मराठी भाषेत अनुवाद केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कमांडट कमांडर बी के सिंह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ,महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळा-महाविद्यालयात मराठी दिन साजरा करावा ,विविध उपक्रम राबवावेत असे सांगितले. आमच्या विद्यालयात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अति तेथे माती या विषयावर छोटीसी नाटिका सादर केली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले ,विद्यार्थ्यांनी दररोज ग्रंथालयातून पुस्तके घेऊन त्याचे वाचन करावे. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी साहित्याच्या विविध प्रकारात लेखन करावे.
कार्यक्रमाचे संचलन प्रल्हाद येवरीकर यांनी केले तर आभार बालाजी कांबळे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.